मुंबई - महाराष्ट्रातल्या 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा 18 जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवली जात नाही, पण ग्रामपंचायतींमध्ये मोठे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता हळूहळू निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारले आहे. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
भाजपाचा दावा
१२, ७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ३ हजार ११३ जागा जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाने २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनेही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे. परंतु असे असले ग्रामपंचायत निवडणुकित आपण अग्रस्थानी असल्याचा भाजपाचा दावा आहे.