मुंबई- मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संध्या दोशी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीदरम्यान तटस्थ भूमिका घेतली. तर राष्ट्रवादी आणि समाजवादीने शिवसेनेला मतदान केले. मात्र, या निवडणुकीत भाजपची दोन मते फुटली आहेत.
भाजपच्या दोन सदस्यांनी शिवसेनेला मतदान केल्याने ती मते अवैध ठरली आहेत. या दोन्ही सदस्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली.
शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेने संध्या दोशी यांनी उमेदवारी दिली. भाजपकडून सुरेखा पाटील यांनी तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरला होता. शिक्षण समितीत शिवसेना 11, भाजप 9, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 1, समाजवादी पक्ष 1 असे सदस्य आहेत. शिक्षण समितीचीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 26 मतदान झाले.