मुंबई - राज्यात शिवसेना विरोधात भाजप असा वाद रंगला असताना आता भाजपने शिवसेनेच्या नेत्यांना गळाला लावण्याचे हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच अंतर्गत वादाच्या ऑडिओ क्लिप भाजपकडून जाणीवपूर्वक व्हायरल केले जात असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा आहे. मात्र शिवसेनेची अंतर्गत खदखद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच रसद पुरवल्याची ऑडिओ क्लिप शनिवारी व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. रामदास कदम यांनी सर्व आरोप फेटाळून लावत खेडमधील राष्ट्रवादीचे नेते संजय कदम आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर बदनामीचे खापर फोडले. रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लीपमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि नाराजी असल्याचे दिसून येते. माजी खासदार अनंत गीते यांनी काही दिवसांपूर्वी महा विकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी नेत्यांवर टीका केली होती. हा वाद शमत असतानाच आता माजी आमदार रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला -
शिवसेनेची नाळ नेहमी कोकणाशी जुळलेली आहे. कोकणातील विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. भाजपने येथे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. आता रत्नागिरी मतदार संघावर पघडा बांधण्यासाठी शिवसेनेतील नाराजांना गोंजरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक असलेले माजी आमदार रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे आणखी दोन ज्येष्ठ नेते भाजपच्या वाटेवर आहेत. पक्षात आपला मानसन्मान राखला जात नाही, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिकार देण्यात आल्याने हे नेते नाराज आहेत. आता परब यांच्या बंगला प्रकरणाला रामदास कदम यांनी सोमय्यांना कागदपत्र पुरवल्याची बाब उजेडात आल्यानंतर मातोश्रीतून एकाही नेत्याची मनधरणी न करता थेट दरवाजेच बंद केल्याचे समजते.