मुंबई :शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. निमित्त आहे आंदोलनाचे. इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिक आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करणार आहे. त्याच वेळी भाजपाही राज्यभर वीज बिला विरोधात आंदोलन करणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षा आंदोलनात्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर समोर येत आहेत.
सकाळी अकरा वाजता आंदोलन
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यापासून दररोज दरवाढ होत आहे. याचा सामान्यांना मोठा फटका बसत आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लुट थांबविली जावी अशी शिवसेनेची मागणी आहे. या दरवाढीविरोधात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राज्यभरात शिवसेनेकडून आंदोलन केले जाणार आहे.
शासकीय कार्यालयांसमोर होणार आंदोलन
या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांकडून बैलगाडी तसेच सायकल मार्च काढले जाणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तर इतर ठिकाणी शासकीय कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार आहे. इंधन दरवाढीचा तीव्र निषेध आंदोलनादरम्यान केला जाईल.
गॅस 25 रुपयांनी महागला
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पाचच दिवसांनी गॅस 25 रुपयांनी महाग झाला आहे. तसेच डिझेल आणि पेट्रोलही शुक्रवारी 35 पैशांनी महागले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून यावर कडाडून टीका करण्यात आली आहे. आई-बाबा आणि साई बाबाची शप्पथ! जीडीपी (म्हणजेच गॅस-डिझेल आणि पेट्रोल) खरंच वाढला! अशा मथळ्याखाली सामनामधून वृत्त प्रकाशित करत दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे.
भाजपाचेही आंदोलन
शिवसेनेचेही आंदोलन होत असताना भाजपानेही आंदोलन पुकारले आहे. वाढीव विज बीलासाठी हे आंदोलन संपुर्ण राज्यात होत आहे. दरम्यान इंधन दर वाढी विरोधात शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात सत्ताधारी शिवसेना आंदोलनाच्या भूमिकेत आली आहे. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, तसेच पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्य सरकारने इंधनावरील टॅक्स कमी केले पाहिजेत. त्यातून जनतेला दिलासा मिळेल. तसेच शिवसेना नेत्यांना आंदोलन करण्याची गरजही भासणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा - 'विद्यमान सत्ताधाऱ्यांची ही शब्दांची 'जुमलेबाजी' देशाला नवीन नाही; शेतकऱ्यांशी अशीच जुमलेबाजी सुरू आहे'