मुंबई -राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने ( Shiv Sena Eknath shinde Group ) मिळून नवीन सरकार स्थापन केले आहे. या सरकार स्थापनेनंतर राज्यात अनेक बाबतीत स्थित्यंतरे झाली आहे. शिंदे समर्थक गट अजूनही आपण शिवसेनेत ( Shiv Sena ) आहोत. असे ठामपणे सांगत आहे. त्यामुळे सर्वात आधी शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पाठोपाठ अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई ठाणे आणि एकूणच महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या मागे असलेले नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबतच राहणार की शिवसेनेसोबत राहणार हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे. शिवसैनिक शिवसेने सोबतच राहतो असे किती जरी म्हटले तरी प्रत्येक आमदाराची एक ताकद असते त्याचा एक गट असतो आणि त्याचा फटका नक्की शिवसेनेला बसेल असे जाणकार सांगत आहेत. ( Municipal Corporation Elections )
शिवसेनेची ठाण्यात पहिली सत्ता -शिवसेनेने पक्ष म्हणून ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा सत्ता स्थापन केली ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा पहिल्यांदा लागला. आनंद दिघे यांचा नेतृत्वाखाली ठाण्यात शिवसेना जोरदार वाढली. आनंद दिघे यांचे शिष्य मानल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे आणि रवींद्र फाटक यांनी शिवसेनेला अधिक बळ दिले. मात्र आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाकडे सध्या 67 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा हे नगरसेवक कोणासोबत राहतील आणि शिवसैनिक कोणासोबत राहतात हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे गट आणि ठाकरे गट यांना आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर या दोघांच्या लढाईत ठाणे जिल्ह्यात भाजपाला आपले पाय पसरण्याची संधी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस दत्ताजी देसाई यांनी व्यक्त केली. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याने शिवसेना दुबळी होणार का हा आता मुख्य प्रश्न आहे.
मुंबई महानगरपालिकेतही बदलणार चित्र -मुंबई महानगरपालिकेत सध्या शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. भाजपकडे ८२ नगरसेवक होते, शिवसेनेकडे 84 नगरसेवक होते मात्र शिवसेनेने आणखी दोन पोट निवडणुका जिंकत आणि मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेले शिवसेनेची संख्या आता 92 वर पोहोचली आहे. दरम्यान आता उद्भवलेल्या नव्या राजकीय परिस्थितीमुळे मुंबईतील चार आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. या चार आमदारांसोबत त्यांच्या मतदारसंघातील सुमारे 20 नगरसेवक जर भाजपाच्या सोबत गेले तर ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत अटीतटीची होणार आहे. मात्र शिंदे गट हा वेगळा लढतो की भाजपा सोबत लढतो. यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली.
शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार -राज्यातील सत्ता गमावल्याने दुखावल्या गेलेल्या शिवसेनेला आता सर्व पातळ्यांवर लढाई लागणार आहे. सर्वात मोठी लढाई आहे. ती मुंबई महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेनेसमोर आता मुंबई महानगरपालिका हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे आणि त्यासाठी ते पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरतील कारण ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याने भाजपसाठी सत्ता महाराष्ट्राची जरी हाती आली असली तरी मुंबईसाठी त्यांना झुंजावे लागणार आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका जिंकणे हे मोठं आव्हान असणार आहे, असेही विवेक भावसार यांनी सांगितले.