मुंबई- 50 टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करीत आहे, पण मराठा समाज सर्वकाही जाणतो. संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील भाजपचे 'मऱ्हाटा' पुढारी हे मौन बाळगून बसले होते की, त्यांची तोंडे बंद केली होती? स्वतः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मराठा आरक्षणावर बोलण्यापासून रोखले होते, पण छत्रपतींचेच वंशज ते! ते बोलायला उभे राहिलेच, पण भाजपातील इतर मराठय़ांचे काय? त्यांनी तर तसा अवसानघातच केला, अशी टीका शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार देण्यासंदर्भातील विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. यावेळी मात्र भाजपाच्या मराठा खासदार संसदेत शांत बसले होते. त्यावरून शिवसेनेने निशाणा साधत या विधेयकाने मराठा समाजाच्या संघर्षास काही अंशी यश आले. त्यासाठी सर्व आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. मात्र केवळ या विधेयकांने मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल का असा सवाल केंद्राला केला आहे.
मराठ्यांनी क्रांतीच्या मशालीने हे शक्य-
संसदेच्या दोन्ही सभागृहांत 127 व्या घटनादुरुस्तीचे विधेयक एकमताने मंजूर झाले. 'ओबीसी' निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांकडे देणारे विधेयक आले. मात्र आता मागासवर्ग कोण? कोणाला आरक्षण द्यायचे? याबाबतचे अधिकार राज्यांकडे आलेच आहेत. महाराष्ट्रातील फक्त मराठा समाजालाच नव्हे तर देशभरातील जाट, गुर्जर, पटेल वगैरे अनेक समाजांच्या लोकांना या विधेयक मंजुरीचा फायदा मिळणार आहे, पण एक मात्र मान्य करावेच लागेल. महाराष्ट्रात मराठा समाजातील तरुणांनी आंदोलने करून क्रांतीची मशाल भडकवली नसती, तर काहीच घडले नसते. महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचे पाऊल पडले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.