मुंबई-नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार हा भाजपने शब्द दिला होता. हा शब्द भाजपने पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे असे वक्तव्य त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मग फडणवीसांचे महाराष्ट्रातील पंटर पचकले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता. पण त्यांना काय माहित या पंटरांचा पचका वर्षभरापूर्वीच झाला होता. ते दु:ख विसरण्यासाठीच भाजपचे नेते सध्या बिहारमध्ये असतात असा टोला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे ट्वीट केले होते. तोच धागा पकडून फडणवीसांना दिलेल्या शब्दाची आठवण या अग्रलेखातून करून देताना टोले लगावण्यात आले आहेत.
...म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे
बिहारचे सरकार पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही असा दावाही त्यांचा आहे. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे.
शपथग्रहण सोहळ्यात नेहमीची जान आणि उत्साह नव्हता
नितीशकुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, पण यावेळी शपथग्रहण सोहळय़ात नेहमीची जान आणि उत्साह नव्हता. संपूर्ण सोहळय़ावर भारतीय जनता पक्षाचीच छाप होती. बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विजयाचा उत्सव साजरा करीत आहेत ते ‘भाजप’वीर दुसऱ्या क्रमांकावर आणि तेजस्वी यादवांचा ‘राजद’ पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे, पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे.