मुंबई - महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत सातवा उमेदवार उतरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपली मते फुटू नयेत म्हणून सर्वांनीच कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याने त्यांच्यावर सध्या भाजपकडून टीका होतेय. याला आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर ( Shiv sena MP Sanjay Raut on BJP ) दिले असून ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये हलवले
'हा' निवडणूक प्रक्रियेचा भाग -शिवसेनेचे आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेत या प्रश्नावर राऊत म्हणाले की, "त्यांचे आमदार पक्षाच्या कार्यालयात बसले आहेत का? ही एक व्यवस्था केलेली आहे. सगळ्याच पक्षाचे नेते अशा निवडणुकांना एकत्र येत असतात. आमदारांना मतदान संदर्भात काही सूचना द्यायच्या असतात. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या काही प्रक्रिया ह्या खूप तांत्रिक असतात. त्या संदर्भात आमदारांना थोडे मार्गदर्शन करायचे असते. म्हणून या सर्वांना एकत्र बोलावलेल आहे."
तुमचे ते गेट-टुगेदर आणि... - "अशाप्रकारे भारतीय जनता पक्षाने देखील आपले आमदार ठेवलेले आहेत. त्यासाठी थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे असे काय आहे? तुमचे ते गेट-टुगेदर आणि आमचे ते आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो? हे प्रश्न मीडियासमोर चर्चा करण्यासारखे नाहीत. शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. कोण काय बोलतील काय टोमणे मारताय काय पिना मारतय, त्याच्या जवळ जाऊ नका दहा तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल." असे म्हणत संजय राऊत यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटला- तर सध्या देशभर चर्चेचा विषय सुरू असलेल्या नुपुर शर्मा प्रकरणावर राऊत म्हणाले की, "प्रथमच आपल्या देशाला माफी मागावी लागली. त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. प्रथमच एका लहान देशाकडून मोठ्या देशाला माफी मागण्याचा आग्रह केला जातो आहे. भाजपने ज्या प्रकारचे विचार देशांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यातून त्यांचे नियंत्रण सुटला आहे. त्यांच्या लोकांवरच हे सर्व प्रकरण उलट येतय आणि हे लोक धर्माधर्मात तेढ निर्माण करत आहेत आणि देशाची बदनामी सुरू आहे." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा -MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी यांना उमेदवारी