मुंबई -राजस्थानी आणि गुजराती माणसांच्या हातात मुंबईतील आर्थिक नाड्या आहेत. मुंबईच्या विकासात गुजराती आणि राजस्थानी माणसांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गुजराती आणि राजस्थानी माणूस गेला, मुंबई आर्थिक राजधानी राहील काय, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर टीका केली असून थोडक्यात काय तर मराठी माणूस भिकारडा आहे. हा 105 हुतात्म्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल -मी लोकांना सांगत असतो, की मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसांना काढून टाका, ही मुंबई आर्थिक राजधानी राहणारच नाही. तुमच्याकडे पैसा राहणारच नाही असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केले. मुंबई ठाण्यातील व्यवसाय हे गुजराती आणि राजस्थानी माणसांच्या हातात आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील आर्थिक नाड्य़ा या माणसांच्या हातात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजराती आणि मारवाडी माणसांचे मुंबईच्या विकासात योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
थोडक्यात . . मराठी माणूस भिकारडा आहे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईवरील वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर खरपूस समाचार घेतला आहे. 'थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय?' अशी टीकादेखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
ऊठ मराठ्या ऊठ -संजय राऊत यांनी लगेच दुसरे ट्विट करत मराठी माणसांना आवाहनही केले आहे. यात त्यांनी आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ..शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल.. असे आवाहनही संजय राऊत यांनी मराठ्यांना केले आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनीही समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. यात त्यांनी 'महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय, महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा' असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.