महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mp Sanjay Raut Statement : भूकंप होणार नाही, फक्त संशयास्पद वातावरण निर्माण केले - संजय राऊत - संजय राऊत लेटेस्ट न्यूज

मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथे गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून वाद आहे. त्यामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे.

Shiv Sena Mp Sanjay Raut
शिवसेना खासदार संजय राऊत

By

Published : Jun 21, 2022, 11:04 AM IST

Updated : Jun 21, 2022, 1:33 PM IST

मुंबई - मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात ते कधीच खपवून घेतले जाणार नाही. पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद शिवसेनेत जन्माला आली नाही. त्यामुळे कोणताही भूकंप होणार नसल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेचे आमदार हे गुजरातला गेले आहेत. मात्र त्या आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. त्यांना आपल्याला येथे का आणले आहे, याबाबत माहिती नसल्याची माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. जोपर्यंत त्यांच्याशी संपर्क होत नाही, त्याबाबत बोलणार नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.

मध्यप्रदेश राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही -भाजप महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे यावेळीही भाजपचा हा कावा महाराष्ट्र खपवून घेणार नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न चालणार नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदेशी संपर्क झाला, आम्ही चर्चा करत आहोत -एकनाथ शिंदे यांनी आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत गुजरातमधील सूरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. मात्र या आमदारांमधील कोणत्याही नेत्यांचा फोन लागत नाही. असे असतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या आमदारांशी आमचा संपर्क झाला असून आम्ही चर्चा करत असल्याचे सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांच्याशीही आमचा संपर्क झाल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वाईट काळात सोबत होते -एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावंत नेते आहेत. ते वाईट काळात शिवसेनेच्या सोबत होते. त्यामुळे अशा नेत्याने बंड करणे हे कोणीही मान्य करणार नाही. आमचे अद्याप त्यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे आत्ताच त्याबाबत काही सांगता येणे शक्य नसल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

काय आहे प्रकरण -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच वाद झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी भाषण केले नव्हते. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन मत फुटले आहेत. त्याचे खापर एकनाथ शिंदेवर फोडण्यात आले. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. या वादातून एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी 35 आमदारासोबत गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे फोन नॉट रिचेबल आहेत.

Last Updated : Jun 21, 2022, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details