मुंबई - मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुन्हा त्यांनी किरीट सोमैया ( Sanjay Raut on kirit somaiya ) यांच्यावर 400 कोटींच्या वसूलीचा आरोप केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांवर ( Sanjay Raut on Devendra Fadnavis ) विश्वास असल्याचं आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी बोलून दाखवलं. किरीट सोमैया यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली 300 ते 400 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पवईतील आयआयटीच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून सोमय्या यांनी यातून कोट्यवधीचा मलिदा लटला असा आरोप राऊत यांनी केला आहे. गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
पुनर्वसनाच्या नावाखाली खंडणी वसुली
पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या नावाखाली तीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात खंडणी वसुली करत सोमैयांनी कोट्यवधीचा मलिदा जमा केला आहे. सोमैयांविरोधात सुमारे 211 प्रकरणं आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावावर खोट्या स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. एवढा मोठा घोटाळा आहे की आम्हाला मोजायला अवघड जाते, असे राऊत म्हणाले.