मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुद्वारा रकीबगंज येथे दिलेल्या भेटीचे शिवसेनेने 'सामना'तून स्वागत केले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवर आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढाईचा अंत काय? असा सवालही 'सामना'च्या माध्यमातून मोदी सरकारला विचारला आहे. गुरुवाणीचा सारांश देताना, तुमची 'वेळ' येईल तेव्हा कर्मांचा 'हिशोब' होईल असा इशाराही मोदी सरकारला शिवसेनेने दिला आहे.
दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात अचानक भेट दिली. गुरु तेगबहादूर यांच्या समाधीपुढे पंतप्रधान नतमस्तक झाले. पंतप्रधानांच्या या कृतीला विरोधकांनी ढोंग आणि नाटक म्हटले, ही विरोधकांची टीका असल्याचे 'सामना'च्या 'गुरुवाणी, लढाईचा अंत काय?' अग्रलेखात म्हटले आहे. गुरुद्वारा भेटीत पंतप्रधान काय म्हणाले हे विस्ताराने सांगत, अग्रलेखात म्हटले आहे, की गेल्या एक महिन्यापासून पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतो आहे. हा शेतकरी 'शीख' म्हणजे लढवय्या समाज आहे. देशाच्या रक्षणासाठी शिखांचे योगदान मोठे आहे. अशा शिखांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु असतानाच पंतप्रधान रकीबगंज गुरुद्वारात अत्यंत साधेपणाने गेले. पोलिसी सुरक्षेचा लवाजमा दूर ठेवून ते गुरुद्वारात गेले व तेगबहादूर यांच्या समाधीपुढे दंडवत घातला.