मुंबई :संजय राऊत यांची प्रतिक्रिया :भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसमहाराष्ट्रात राबवत आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या या प्रयत्नांना यश येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण करून त्यांना गुजरातला ठेवण्यात आले आहे. तसेच, या आमदारांवर गुजरात पोलिसांबरोबर केंद्रीय पोलिसांचा कडा पहारा आहे. या आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होत असल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. याबाबत काही आमदारांच्या नातेवाईकांनी तक्रारही केली असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे भाजपचे षडयंत्र : तसेच भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असून, यातून शिवसेना नक्की मार्ग काढेल. शिवसेना संघटनेला अद्याप तडा गेलेला नाही, असा विश्वास आणि संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेते मंडळींच्या घेतलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून, त्या जागी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदेंना परत येण्याचे आवाहन :एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी असून, गेली अनेक वर्षे आपण सोबत काम करीत आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना काही गैरसमज झाले असतील, तर ते गैरसमज दूर केले जाऊ शकतात. यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबईला येऊन चर्चा करणे आवश्यक आहे. गुजरातला जाऊन शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करणे हे शिवसेनेच्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी परत यावे, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.