मुंबई - राज्यात सध्या सर्कस सुरु झाली आहे. मात्र हा गद्दार हा गद्दारच असतो. न्यायालयात उद्यापासून एक महत्त्वाची केस सुरू होत असून ती शिवसेनेसाठी महत्त्वाची नाही, तर देशासाठी महत्त्वाची राहील. कारण या देशात लोकशाही आहे की नाही ? किंवा टिकणार की नाही ? याच्यावर उद्या शिक्कामोर्तब होणार असल्याचे असे आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यावेळी म्हणाले. मुंबई, कुर्ला येथील नेहरूनगर येथे निष्ठा यात्रेत ते बोलत होते. शिवसेनेच्या 12 खासदारांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. बंडखोर आमदार आणि खासदारांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला आहे.
आतापर्यंत केवळ समाजकार्य केलं राजकारण नाही - महाराष्ट्र दौरा सुरू केला असून लोकांना भेटतो आहे. राज्यातील सगळ्या लोकांना भेटायला जाणार आहे. कुठे कोणावर आरोप, प्रत्यारोप, राजकीय टीका टिप्पणी करायला जायचे नसून लोकांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जायचे आहे. आम्ही आतापर्यंत केवळ समाजकार्य केलं राजकारण केलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोर लोकप्रतिनिधींवर केली आहे.
सध्या सर्कस सुरू झाली- शिवसेना पक्षाचे काय होणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार हे पक्षप्रमुखांकडे आहेत. परंतु, काहीजण जाणीवपूर्वक वातावरण तयार करत आहेत. ही सध्या सर्कस सुरू झालेली आहे. स्वतःच्या मनाला पटवून देण्यासाठी, सोबत आलेले थांबविण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागलेला असून लोकांसमोर जगजाहीर झाले आहे. मूळ शिवसैनिक इथेच आहेत. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवा आणि पुन्हा निवडून या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. सेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे.