मुंबई :दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे.(Andheri by poll election). शिवसेनेची या मतदार संघावर मजबूत पकड आहे. आता होणाऱ्या पोट निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र या निवडणूकीत शिवसेनेचे पारडे जड असून लटके यांच्या पत्नीला मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. (shiv sena favorite in andheri by poll election).
सर्वसमावेशक मतदारसंघ:अंधेरी पूर्वेकडील साकीनाका ते महाकाली गुंफा परिसर, अंधेरी एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गुंदवली, एसिक रुग्णालय, भवानी नगर, विजय नगर, लार्सन अँड टुब्रो पॉवर कॉम्प्लेक्स, पवईचा काही भाग, अंधेरी-कुर्ला रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गालगतचा भाग या मतदारसंघात येतो. कोकणातील मंडळी या भागात मोठ्या संख्येने राहतात. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग याशिवाय सामाजिक व आर्थिक कारणांमुळे झोपडपट्टीत राहणारा वर्गही या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. एका अर्थाने कॉस्मोपोलिटन चेहरा असलेल्या या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि देशभरातील विविध प्रांतातून आलेली मंडळी गुण्यागोविंदाने राहत आहेत. काँग्रेसचा परंपरागत मतदार या भागात असला तरी मुंबईच्या राजकारणाचा बदलत्या काळात या भागात सत्ताधारी शिवसेना रुजली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला : एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व या मतदार संघात होते. मात्र, आता काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शिवसेनेने विकासकामांच्या जोरावर गेल्या दहा वर्षांपासून येथे पाय रोवले आहेत. भाजपा कॉंग्रेसमधून आलेल्या मुरजी पटेल यांच्या माध्यमातून मतदार संघावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील विधानसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर येत्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल पुन्हा नशीब आजमवणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती. आता मतांचे विभाजन होणार आहे. परंतु, हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेचा लाभ ऋतुजा लटके यांना होण्याची शक्यता आहे.