मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ( NCP ) विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला ( Shivsena ) दाबण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याबाबत शिवसेनेच्या दोन आजी-माजी खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने समजून घ्यावे, अन्यथा स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विचार करावा लागेल, असा इशाराच शिवसेनेकडून देण्यात आला आहे. तर अशा पद्धतीची कोणतीही कुरबुर नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी दिला जात नसल्याचे शिवसेना आणि काँग्रेस आमदारांचे म्हणणे होते. त्या पाठोपाठ शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून विकास कामे करून घेतली जात आहे. त्यासाठी त्यांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोपही शिवसेनेच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केला होता. यासंदर्भात गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनीही अशा पद्धतीची विकास कामे होत असतील तर त्याला स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील हा बेबनाव लपून राहिलेला नाही.
शिवसेना खासदारांची नाराजी -शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातारा येथे जाहीरपणे बोलताना राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा अथवा फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे योग्य नाही. राष्ट्रवादीने या कारवाया थांबवावेत, असा इशारा शिंदे यांनी दिला होता. माझी खासदार गजानन कीर्तिकर यांनीही नगरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना थेट इशाराच दिला आहे. रोहित पवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत आहेत, हे अयोग्य असून अशा प्रकारचे धंदे त्यांनी थांबवावेत अन्यथा याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल, असेही कीर्तीकर यांनी सांगितले.