मुंबई -शिवसेनेतील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मध्यस्थी करण्याची चर्चा केल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केले आहे. मात्र ते निराधार आणि निव्वळ दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे.
निष्ठावंत आमदारांनी दिला दगा -शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय मानले जातात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा किंवा त्यांना सांगितल्याशिवाय भूमिका स्पष्ट करत नव्हते. त्याच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेऊन विश्वास घात केला. केवळ एक नव्हे तर तब्बल 51 आमदारांना सुरतमध्ये नेऊन बंड पुकारले. आतापर्यंत एक एक करत संपूर्ण आमदार गळाला लावले. मुख्यमंत्री ठाकरे यांना यामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. त्यातूनच निष्ठावंत आमदारांनी दगा दिल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार, एच. के. पाटील, कमलनाथ यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्षप्रमुख पद सोडणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद न सोडण्याचा सल्ला दिला होता.