मुंबई -मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागात मराठी विरुद्ध अमराठी वाद चांगलाच रंगला आहे. चिटणीस पदावरून अधिकारी न्यायालयात गेले असताना त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे मराठी प्रेम खोटे असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपाचे मराठी प्रेम बेगडी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचे दिसत आहे.
तेव्हा भाजापवाले झोपले होते का ? -
मुंबई महापालिकेच्या चिटणीस पदावर संगीता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला चिटणीस विभागात काम करणाऱ्या शुभांगी सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने शुभांगी सावंत यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतरही संगीता शर्मा यांनाच पदावर ठेवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेकडून मराठी अधिकाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव बोलत होते. यावेळी बोलताना, भाजपाने कोकण कन्या मराठी अधिकाऱ्यावर अन्याय आहे असे म्हटले आहे. हे मगरीचे अश्रू आहेत. भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये मराठी नगरसेवक किती, त्यांना मराठी बोलता येते का, भाजपाने किती मराठी उमेदवारांना उमेदवारी दिली. पालिकेत अनेक वरिष्ठ पदे इतर भाषिक अधिकाऱ्यांना देताना भाजपा झोपली होती का असे प्रश्न उपस्थित करत भाजपचे मराठी प्रेम हे बेगडी असल्याची टीका यशवंत जाधव यांनी केली आहे.