महाराष्ट्र

maharashtra

उखडून फेकायचेच तर चीनने वसवलेले गाव आणि जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद उखडून फेका - शिवसेनेने भाजपाला सुनावले

By

Published : Nov 9, 2021, 7:45 AM IST

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी उखडून फेका असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून घेतला आहे. भारतीय जनता पक्ष हा ३६५ दिवस फक्त निवडणुकांचाच विचार करत असतो, देशात इतरही समस्या आहेत, याची किती चर्चा असा सवाल शिवसेनेने केला आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते. असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

शिवसेनेने भाजपाला सुनावले
शिवसेनेने भाजपाला सुनावले

मुंबई- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे . हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे . दुसऱ्यांना उखडता - उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून ! असा इशारा शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दिला आहे. त्यासोबतच उखडायचे असेल तर अरुणाचलमध्ये वसलेले चीनचे गाव आणि जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद उखडून फेका, असेही शिवसेनेने सुनावले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी उखडून फेका असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून घेतला आहे. भारतीय जनता पक्ष हा ३६५ दिवस फक्त निवडणुकांचाच विचार करत असतो, देशात इतरही समस्या आहेत, याची किती चर्चा असा सवाल शिवसेनेने केला आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते. असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

'जनतेचा विश्वास भाजपने गमावला आहे'

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत देशातील महागाई, भ्रष्टाचार, सीमेवर होत असलेली घोसखोरी, दहशतवाद यावर कार्यकारिणीत साधकबाधक चर्चा व्हायला काहीच हरकत नव्हती. मात्र चर्चा झाली 'पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता.' असा टोला शिवसनेने लगावला आहे.

'कार्यकारिणीत 'महागाई'वर कोणीच गांभीर्याने बोलले नाही. पेट्रोल-डिझेल आजही शंभरी पार आहे. गॅस सिलिंडर 1000 च्या वर गेले आहे. भाजीपाला सामान्य जनतेस परवडण्यापलीकडे पोहोचला. खाद्यतेलाने 150 चा आकडा पार केला. यावर कार्यकारिणीतील कोणाचेच हृदय का जळले नाही? राष्ट्रीय कार्यकारिणी सुरू असतानाच ऐतिहासिक, पण अमानुष नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नोटबंदीमुळे भ्रष्टाचार नष्ट होईल असे सांगितले होते. काळा पैसा परत देशात येईल, अर्थव्यवस्था 'कॅशलेस' होईल, दहशतवाद संपून जाईल, असे सांगितले. हे सर्व खरेच झाले काय? यावर कार्यकारिणीत साधकबाधक चर्चा व्हायला काहीच हरकत नव्हती. या सगळय़ा प्रकरणांत जनतेचे हाल झाले. त्यामुळे बेहाल जनतेचा विश्वास भाजपने गमावला आहे.' असे शिवसेनेने म्हटले आहे.

'जे धोतरात कमावले ते लुगडय़ात गमावले'

'नोटबंदीमुळे अतिरेक्यांना अर्थपुरवठा करणारा अमली पदार्थांचा व्यापार बंद पडेल, असे जोरात सांगितले गेले. प्रत्यक्षात भाजपचे हस्तक व पदाधिकारी हे अमली पदार्थांच्या व्यवहारात कसे गुंतले आहेत त्याचा पर्दापाश मुंबईत रोज सुरू आहे. एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी 'जॉइण्ट व्हेंचर्स' करून ड्रग्जसंदर्भातले खोटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपपुरस्कृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपचे भागभांडवल या उद्योगात मोठय़ा प्रमाणात गुंतले आहे. हे असे पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल?' असा सवाल करत, 'जे धोतरात कमावले ते लुगडय़ात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे.' असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

'कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही'

काँग्रेससह अनेक पक्षांवर भाजप नेते सातत्याने कुटुंबकेंद्रीत पक्ष असल्याची टीका करतात. भाजपच्या केंद्रीय कार्यकारणीत पंतप्रधान मोदींनीही हाच सूर अळवला. त्यावरुन शिवसेनेने म्हटले आहे, 'पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त 'मोदी मोदी' करण्याची वेळ पक्षावर आली नसती. भाजप हा कुटुंबकेंद्रित पक्ष नाही. हा पक्ष एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असे श्री. मोदी यांनी सांगितले. कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय?' असा खडा सवाल शिवसेनेने केला आहे.

'आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत?'

राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे असे सांगत शिवसेनेने म्हटले आहे, 'भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या जडणघडणीत ज्यांनी हयात घालवली अशा सगळय़ाच ज्येष्ठश्रेष्ठांना आज 'मार्गदर्शक मंडळा'च्या कोंदणात 'मानाचे स्थान' दिले असले तरी हा व्यक्तिकेंद्रित आणि 'उदो उदो' राजकीय व्यवस्थेचाच भाग आहे. भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही?' असा थेट सवाल करत, 'निवडणुकांसाठी पैसा येतो कुठून? केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या हुकुमावरून राजकीय दाबदबाव आणत असतात? हे विषय दुर्लक्षित करता येत नाहीत.' असे शिवसनेने भाजपला सुनावले आहे.

'शेतकऱ्यांच्या बलिदानावर दोन ओळींचे दुःख नाही'

टशेतकऱ्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांचे इतके प्रदीर्घ काळ चाललेले आंदोलन कुणी पाहिले नसेल. आतापर्यंत 700 च्या वर शेतकऱ्यांनी या आंदोलनात बलिदान केले, पण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यावर दोन ओळींचे दुःख व्यक्त केले असे दिसले नाही. कुत्रा मेल्यावर दिल्लीतील नेते शोकसंदेश जारी करतात, पण शेतकरी आंदोलनात इतके लोक मरूनही लोकसभेत किंवा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शोक प्रस्ताव मंजूर होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या विषयावर दिल्ली सरकारचे कान उपटले आहेत. श्री. मलिक हे भाजपने नेमलेले राज्यपाल आहेत, पण ते बेधडकपणे सत्य बोलले आहेत. जनभावना त्यापेक्षा वेगळय़ा नाहीत.' असा इशारा शिवसेनेन दिला आहे.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अग्रलेखात म्हटले आहे, 'भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी अत्यंत राष्ट्रहिताचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, महागाईविरोधी असे विचार ठणकावून व्यक्त केले म्हणजे काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब त्यांनी फेकला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून!'

ABOUT THE AUTHOR

...view details