मुंबई - सध्या आगामी 2024 निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे चित्र देशात दिसू लागले आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांकडून ही बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. मात्र विरोधकांनी फक्त 'चर्चा पे चर्चा' न करता, देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे रोखठोक मत व्यक्त शिवसेनेने व्यक्त केले आहे. तसेच 2024 च्या निवडणुकांसाठी मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. 'मोदी नामा'ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम विरोधकांना करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या 'जत्रा' लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, अशी शक्यता व्यक्त करत शिवसेनेने विरोधकांना ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज असल्याचा इशारा सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे.
विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची 'मोट' बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त 'चर्चा पे चर्चा' नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने सामनातून स्पष्ट केले आहे.
उपरे बोहल्यावर आणि कार्यकर्ते खुळ्यासारखे जत्रेत सामील-
मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद 'जत्रा' सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या 'जत्रे'त येडय़ाखुळय़ासारखे सामील झाले आहेत, अशी टीकाही शिवसेनेने जनआशीर्वाद काढणाऱ्या नेत्यांवर केली आहे.
अनेक पक्षाचे पडके वाडे ओसाड-
जनआशीर्वाद यात्रेची एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरू असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील. 19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले, या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाडय़ांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये,असा सल्ला शिवसेनेने या विरोधकांच्या एकजुटीला मजबूत करण्यासाठी दिला आहे.