मुंबई : पैसे देऊन पैठण मधील शिंदे गटाच्या ( shinde group ) सभेला गर्दी जमवल्याचा आरोप झाल्यानंतर आता जळगाव मधून तीन ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक ट्रेनसाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७५ लाख रुपये मोजण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचा खटाटोप ( Gathering crowds for the Dussehra melava ) शिंदे गडाकडून सुरू झाला असला तरी सर्वसामान्य प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.
दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट :आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटत चालले आहे. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एरंडोलचे चिमणराव पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, पाचोऱ्याचे चंद्रकांत पाटील व चोपड्याच्या लता सोनवणे असे एकूण ५ आमदार आहेत. त्यांच्या प्रत्येक मतदारसंघातून मेळाव्यासाठी नेण्याच्या गर्दीचे नियोजन झाले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातूनच मुंबईकडे जाणाऱ्या ३ रेल्वेगाड्या बुक करण्यात आल्या असून प्रत्येक ट्रेनसाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७५ लाख रुपये मोजण्यात आल्याचे समजते.