मुंबई - उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे शिवसेनेत सक्रिय होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष पदाची धुरा तेजस ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, तेजस ठाकरे हे शिवसेनेत सक्रिय होऊन राजकारणात एंट्री करतील याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मिळवलेला नसल्याचे शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितले आहे. तसेच, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यास सर्व शिवसैनिकांना आनंद होईल असही त्या म्हणाल्या आहेत.
शिवसेनेला फायदा होईल असे मतही मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले - तेजस ठाकरे संशोधक आहेत. ते राजकारणात सक्रिय नसले तरी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते उपस्थित असतात. राजकारणात त्यांना आवड आहे. यासोबतच ठाकरे कुटुंबाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक आकर्षण आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ते राजकारणात आले तर नक्कीच त्याचा शिवसेनेला फायदा होईल असे मतही मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे.