मुंबई -विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांची निवड करण्यात आली. यावेळी व्हीपच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाने मतदान केल्याचा आक्षेपही घेण्यात आला. मात्र राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर त्यांच्या अभिनंदन करताना आपल्या भाषणात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( NCP Leader Ajit Pawar ) यांनी चांगलीच फटकेबाजी केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना जर मुख्यमंत्री व्हायचे होते तर, त्यांनी माझ्या कानात येऊन सांगायला हवे होते. मीच उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री करायला सांगितले असते, असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला. तसेच शेजारी बसलेल्या आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्याकडे इशारा करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला जमले असते असे विचारले. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही आपण त्यांना सांगितले असल्याचे सभागृहात सांगितले. एकूणच नव्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन भाषणादरम्यान दोन्हीकडून चांगलेच फटकेबाजी झालेली पाहायला मिळाली.
जे झालं ते योग्य होतं का ? -भाजपच्या आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीने सांगावे. राज्यात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून सुरू असलेले राजकारण पाहता आता सत्तेत बसलेल्या मूळ 105 भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आपल्या सद्सदविवेक बुद्धीला प्रश्न विचारावा, असा मिश्किल टोला अजित पवारांनी भाजपला लगावला. तसेच अनेक वर्षात राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते झटले. पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. मात्र, आता सध्या जर भारतीय जनता पक्षाकडे पाहिले तर बाहेरूनच आलेल्या लोकांना जास्त महत्व दिले जाते. विधानसभेच्या पहिल्या बाकावर ही भारतीय जनता पक्षाचे मूळ नेते दिसत नाहीत. त्यांच्याकडे महत्त्वाची पद दिली जात नाही, असा टोला आपल्या भाषणातून अजित पवारांनी लगावला आहे.