मुंबई -राज्यमंत्रिमंडळ विस्तार 13 जुलैला होण्याची शक्यता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) त्यांनी वर्तवली आहे. मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार या सरकारकडून झालेला नाही. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा इशारा ही दिला होता. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, विधिमंडळात आमचे संख्यबळ जास्त आहे. त्यानुसार धनुष्यबाण निशाणी ही आमच्याकडेच राहणार आहे.
दिल्लीत मंत्रिमंडळावर चर्चा - 7 आणि 8 जुलै असे दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत अमित शहा यांच्या सोबत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली असल्याची माहिती आहे. दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून पहिल्या टप्यात शिंदे गटाकडून 5 ते 6 मंत्री शपथ घेतली. तर 8 ते 10 मंत्री भाजपकडून शपथ घेण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे सरकार -शिवसेनेमधून 40 आमदारांचा वेगळा गट बाहेर पडल्यावर भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना सरकार बनविण्यासाठी पाठिंबा दिला. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुतम चाचणी घेण्यासाठी पाचारण केले. यासाठी राज्यपालांनी विधानसभेचे 3 व 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलाविले होते. या अधिवेशनात शिंदे सरकारने बहुतम चाचणी पूर्ण केली.