मुंबई -शहरात महापालिका आणि सरकारी अनेक रुग्णालये आहेत. मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरात एकही मोठे रुग्णालय नसल्याने येथील नागरिकांना शहरातील मोठ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे पश्चिम उपनगरात भगवती रुग्णालयाच्या नूतनीकरणावेळी सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनवावे, अशी मागणी पालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
भगवती रुग्णालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारा, शितल म्हात्रेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पालिकेच्या भगवती रुग्णालयाची पुनर्बांधणी केली जात आहे. या रुग्णालयाची पुनर्बांधणी करताना सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारावे, अशी मागणी पालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
महापालिकेची केईएम, नायर आणि सायन ही मोठी रुग्णालये आहेत. ही तीनही रुग्णालये शहर विभागात आहेत. याठिकाणी गरिबांवर मोफत आणि इतरांवर स्वस्त उपचार केले जात असल्याने मुंबईसह राज्यातील तसेच देशभरातील रुग्णांची प्रचंड गर्दी असते. तर दुसरीकडे महापालिकेची पूर्व आणि पश्चिम उपनगरात छोटी रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये योग्य अशा सोयी सुविधा तसेच डॉक्टर नसल्याने शहरातील मोठ्या रुग्णालयात जावे लागते.
मुंबईत ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. ट्रॅफिक आणि उपनगरातून शहरातील रुग्णालयांकडे जाण्यासाठी लागणारे अंतर पाहता मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच अनेकांचा जीव जातो. यामुळे उपनगरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. पालिकेच्या भगवती रुग्णालयाची पुनर्बांधणी केली जात आहे. या रुग्णालयाची पुनर्बांधणी करताना सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारावे, अशी मागणी म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास त्याचा फायदा विरार आणि पालघरमधील नागरिकांना होणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.