मुंबई- आझाद मैदानावर 1 फेब्रुवारीला शरजील इमाम याच्या समर्थानात घोषणा देण्याच्या प्रकरणात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची विद्यार्थी असलेल्या उर्वशी चुडावाला हिच्यासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अद्यापही या प्रकरणी मुख्य आरोपी उर्वशी चुडावाला हिचा शोध लागलेला नाही.
हेही वाचा -शरजील इमाम समर्थन प्रकरणी उर्वशी चुडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
'माझ्या मुलीला कोणीतरी फूस लावत आहे, तिने पोलिसांसमोर जावे'
मंगळवारी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात उर्वशी चुडावालाच्या आईची जबानी आझाद मैदान पोलिसांनी घेतली. या दरम्यान माझ्या मुलीची या प्रकरणात काहीही चूक नसून कोणीतरी तिला फूस लावून अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उर्वशी चुडावाला हिच्या आईने सांगितले आहे. मी स्वतः तिचा शोध घेत असून तिला पोलिसांसमोर जाण्याचे आवाहन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण -
मुंबईतील आझाद मैदान येथे 1 फेब्रुवारीला एलजीबीटी समुदायाच्या आंदोलनादरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या शरजील इमाम याच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या. यावेळी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तब्बल 50 ते 60 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातली मुख्य आरोपी उर्वशी चुडावाला ही टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव समोर येत आहे. उर्वशी ही एमए (मीडिया)ची विद्यार्थिनी आहे. उर्वशी चुडावाला ही TISS Queer Collective या लैंगिक भेदभावविरोधात काम करणाऱ्या संस्थेतदेखील सहभागी आहे. तिनेच या घोषणा दिल्याचे समोर आल्यानंतर तिच्यासहित इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींवर कलम 124ए(देशद्रोह), 153बी(राष्ट्रीय अखंडतेचा पूर्वग्रह) आणि 505(सार्वजनिक गैरवर्तन विधान) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.