मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्रातील दोन दिवसांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दौर्याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे हा दौरा रद्द होण्याचा प्रश्नच उरत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली. तर दुसरीकडे हा दौरा रद्द झाल्याने राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
माध्यमांमध्ये केवळ वावड्या -
उत्तर महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्राचा दोन दिवसांचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र हा दौरा नेमका कधी होईल, याविषयी राष्ट्रवादीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. त्यामुळे याविषयी माध्यमांमध्ये केवळ वावड्या उठविण्यात आल्या, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण -
शरद पवार हे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याचा दौरा करणार होते. या दरम्यान या तिन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी भेटणार होते. याच दोन दिवसाच्या दौऱ्यात भाजपमधील अनेक नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही कार्यक्रम निश्चित करण्यात आला नव्हता, असे सांगण्यात आले.