मुंबई - महाराष्ट्राच्या दुसऱ्या विधानसभेसाठी २१ फेब्रुवारी १९६७ रोजी निवडणूक घेण्यात आली. १९६२ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २६४ मतदारसंघ होते पण १९६७ च्या निवडणुकीत त्यांची संख्या वाढून २७० झाली. यातील ६३ मतदारसंघ विदर्भात होते. या निवडणुकीत २७० पैकी २०२ जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले.
महाराष्ट्राच्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी २ कोटी २१ लाख ४७ हजार ३२२ इतके नोंदणीकृत मतदार होते. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी १३ लाख ४३ हजार ७३२ तर महिला मतदारांची संख्या होती १ कोटी ८० लाख ३ हजार ५९०. त्यापैकी ६४.८४ टक्के म्हणजे १ कोटी, ४३ लाख ५९ हजार५७७ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. २७० जागांसाठी एकूण १२४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या होती केवळ १९, यातील ९ महिला निवडून विधानसभेत पोहोचल्या होत्या.
१९६७ च्या निवडणुकीत एकूण २७० पैकी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची संख्या होती २३९ त्यानंतर अनुसुचित जाती १५ व अनुसुचित जमाती प्रवर्गातून १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ९ लाख ८७ हजार ८४२ मते बाद ठरविण्यात आली याची टक्केवारी ६.८८ इतकी होती.या निवडणुकीत २७० पैकी तब्बल २०३ जागा जिंकून काँग्रेसने राज्याच्या राजकारणावरील आपला दबदबा कायम राखला. काँग्रेसने मिळवलेल्या मतांची टक्केवारी तब्बल ४७.०३ टक्के इतकी होती. या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाचे नाव होते शेतकरी कामगार पक्ष आणि यांना मिळालेल्या जागा होत्या १९. शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत मिळवलेल्या मतांची टक्केवारी होती केवळ ७.८० टक्के.त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ८, कम्युनिस्ट पक्षाला १०, रिपब्लिकन पार्टीला ५ आणि जनसंघाला ४ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत १६ अपक्षही निवडून आले होते. या निवडणुकीतील काँग्रेसने विक्रम केला व तो अजूनपर्यंत अबाधित आहे.या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी त्र्यंबक भराडे यांचीच पुर्ननिवड करण्यात आली. भराडे हे सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते. 1962 ते 1972 असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते.
मुख्यमंत्रीपदी पुन्हा वसंतराव नाईक -
या निवडणुकीनंतर वसंतराव नाईकांकडेच मुख्यमंत्रीपद गेले व मुख्यमंत्री पदाची ५ वर्षाची टर्म पूर्ण करण्याचा विक्रम पहिल्यांदा त्यांच्याच नावावर नोंदला गेला आहे. नाईक बंजारा समाजातून येत असूनही आपल्या धोरणीपणामुळे त्यांनी सलग 11 वर्षं 2 महिने आणि 15 दिवस इतके दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.
एकदा सेनापती बापट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसले होते. मात्र मुख्यमंत्री नाईक बापट यांच्याशी इतक्या लीनतेने व नम्रतेने वागले की बापटांनी आपले उपोषण स्थळ मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात हलवावे लागले. आपल्या मुत्सद्दीपणाने नाईक यांनी हे आंदोलन प्रसिद्धीपासून रोखले.
तसेच अमरावतीचे वयोवृद्ध समाजसेवक शिवाजीराव पटवर्धन आपल्या महारोगविषयक अभियानाच्या कामाबाबत नोकरशाहीकडून अडवणूक झाल्यास काठी आपटत सचिवालयात येत. त्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री नाईक आपल्या दालनातून बाहेर येत व त्यांच्या पायावर नतमस्तक होत. त्यामुळे पटवर्धनांचा निम्मा राग पळून जात असे. त्याचबरोबर कोणीही तावातावाने तक्रार करावयास आल्यास मुख्यमंत्री त्याच्या खाद्यांवर हात ठेऊन त्याच्याशी नम्रतेने वागत. असे करण्याने तक्रारदाराची सरकारविरोधात कोणतीच तक्रार रहात नसे, असे अनेक किस्से त्यावेळी सांगितले जात असत.
काँग्रेसचा 'हा' विक्रम अजूनही अबाधित -
१९६२ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री वसंत नाईक यांनी शेतीविषयक अनेक विकास योजना सुरू केल्या. रोजगार हमी व गरीबी हटाव सारख्या योजनांच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान उंचावले. त्यामुळे १९६७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २०२ जागांपर्यंत मजल मारली. हा आकडा ओलांडण्याची संधी यावर्षी भाजपकडे आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असूनही भाजप बहुमतापर्यंतही पोहोचला नव्हता. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचा हा विक्रम भाजप मोडते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.