मुंबई - महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार गेल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. 125 तासाची व्हिडिओ रेकॉर्डिंग कशी करण्यात आली, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या रेकॉर्डिंगची सत्यता तपासणे गरजेचे असल्याचेही म्हणाले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोप आणि व्हिडिओ तसेच ऑडिओ क्लिपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
देवेंद्र फडणीस यांनी जे रेकॉर्डिंग विधानसभेमध्ये सादर केले त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आपल्या नावाचा उल्लेख आहे. मात्र या संबंधात कधीही आपलं कोणासोबतही बोलणं झालं नाही, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात काहीही केलं तरी सत्ता स्थापन करता येत नसल्याने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने ही टोकाची भूमिका घेतली असल्याचा टोला शरद पवारांनी या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणीस यांना लगावला. सार्वजनिक जीवनात प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींबाबत कोणतीही शहानिशा न करता थेट आरोप करणे योग्य नाही. विनाकारण तक्रार करून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळा केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग केला जातोय. विशेषता पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडकवण्याचा आतापर्यंतचे सर्वात मोठे उदाहरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. आतापर्यंत जवळपास 90 वेळा केंद्रीय तपास यंत्रणेकडून त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या, असेही त्यांनी सांगितले.