महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...नाहीतर शरद पवारही गेले अमित शाहांच्या भेटीला अशा बातम्या येतील

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले आणि चित्रा वाघ बुधवारी भाजपत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेल्या भाषणा दरम्यान हे वक्तव्य केले.

शरद पवार

By

Published : Jul 30, 2019, 11:36 PM IST

Updated : Jul 31, 2019, 12:21 AM IST

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात जाण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. याचा धसका खुद्द शरद पवार यांनीही घेतला असल्याचे चित्र काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पाहायला मिळाले. जिभेची आणि गळ्याची शस्त्रक्रिया झाली असतानाही मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमाला आलो आहे. जर या कार्यक्रमाला आलो नसतो, तर गिरीश महाजन यांच्या सोबत अमित शाह यांना भेटायला गेलो असल्याच्या बातम्या आल्या असत्या, असे वक्तव्य पवार यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले आणि चित्रा वाघ बुधवारी भाजपत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केले. विधानभवनाच्या सेंट्रल सभागृहात हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाथा" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते. या कार्यक्रमात एकाच मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र आले होते.

प्रकृती बरी नसल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमला यायला जमेल की नाही अशी मला शंका होती. सोमवारी रात्री माझ्या जिभेचे आणि गळ्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यास आणि अधिक बोलण्यास मनाई केली होती. मात्र, सध्याचे राजकीय वातावरण पाहता, हा कार्यक्रम टाळून चालणार नाही, असेही पवार यांनी खेळीमेळीत स्पष्ट केले.

एखाद्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्यास अमित शाह यांच्या भेटीला गेले की काय अशा अर्थाच्या बातम्या ही येतील, असे मिश्किल भाष्य पवार यांनी यावेळी केले. तसेच विधी मंडळातील काही जुन्या आठवणीही त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या. त्याचबरोबर पवार यांनी सभागृहातल्या अभ्यास पूर्ण भाषणांचा उल्लेख करत नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुतीही केली.

Last Updated : Jul 31, 2019, 12:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details