मुंबई - कठीण काळात राज्याची जबाबदारी बॅ. अंतुले यांच्यावर आली होती. ते मुख्यमंत्री बनले तेव्हा मी विधिमंडळात विरोधी पक्षनेता होतो. सभागृहात आमचा रोज संघर्ष होत असे. मात्र या संघर्षानंतर आम्ही त्यांच्या दालनात एकत्र चहापान करायचो. अशा आठवणी आज राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेत अंतुले यांच्या जीवनावरील ''बनाम नर्गिस बाकलम ए.आर.अंतुले'' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी जागवल्या.
रोज संघर्ष पण मैत्री घट्ट; बॅ. अंतुलेंच्या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवारांनी जागवल्या आठवणी - अंजुमन-ए-इस्लाम
अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेत अंतुले यांच्या जीवनावरील ''बनाम नर्गिस बाकलम ए.आर.अंतुले'' या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा मुंबई येथे पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
बॅ. अंतुले हे विधानसभेचे सदस्य होते. त्यांच्यावर काँग्रेसने सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत होते. राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वापासून केंद्रात मंत्रिपदापर्यंतची त्यांनी सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचे गौरवोद्गारही पवारांनी यावेळी काढले. शिवसेनाप्रमुख आणि अंतुले यांच्या घनिष्ठ आणि राजकारणापलीकडील मैत्रीही त्यांनी उलगडली. देशात आणीबाणी लागली असताना देशहितासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी अंतुले आणि पर्यायाने इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात उमेदवार दिला नसल्याचे सांगत पवार यांनी मैत्रीच्या आठवणी ताज्या केल्या.
टेक्नॉलॉजी रोमान्सची दुश्मन -
पत्राच्या माध्यमातून त्या काळात व्यक्त होणारी प्रेम भावना सुखद अनुभव देणारी होती, वाट पाहायला लावणारी होती. तो दुरावा अस्वस्थ करणारा होता. मात्र आता व्हाट्सअप, एसएमएस आणि इमेलच्या काळात हे सर्व काही आपण हरवून बसलो आहोत. टेक्नॉलॉजी हि रोमान्सची खरी दुश्मन आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केले. युवकांनी आणि युवतींनी पत्र लिहावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.