मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी संबंध नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतरही भाजपकडून पवार यांना लक्ष केले जाते. राष्ट्रवादीचे काका-पुतणे हे 'ठग्स ऑफ ठेवीदार' आहे. शरद पवार यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला, नारायण राणेंचे बंड अन् राज ठाकरेंचा शिवसेनेला राम-राम
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्य शिखर बँकेच्या घोटाळाप्रकरणी शीर्ष भागात आहेत. लोन संदर्भातील समितीत अजित पवार होते असे निरीक्षण न्यायायलाने नोंदवले आहे. हे भाजप म्हणत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
राज्य शिखर बँकेच्या एकूण ठेवी 11 हजार कोटी रुपयांच्या असताना 25 हजार कोटींचा घोटाळा झाला कसा? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. याचे उत्तर न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशात आहे. बुडीत निघालेले कारखाने, नियमबाह्य कर्ज आणि बँकेला तोटा होईल, असा कारखान्यांचा खरेदी व्यवहारात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे न्यायालयाने आधीच म्हटले आहे. या संदर्भातील विविध नोंदीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकेच्या संचालक मंडळावर प्राथमिक गुन्हा नोंदवला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे कधीही या बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते. मात्र, त्यांच्या दबावात्मक भूमिकेमुळेच कर्जवाटपात घोटाळा झाला असल्याचे न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे, असे यावेळी शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा - गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली