मुंबई - 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा समोर सक्षम विरोधीपक्ष दिसत नाही. आपल्या पक्षाचे बळ पाहता शरद पवार स्वतः युपीएच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र राजकीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान पदासाठी नाव ठरवलं जाण्याची शक्यता असल्याचे मतं राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
केंद्रात सक्षम विरोधी गटाच्या मागणीला जोर काँग्रेसला सातत्याने अपयश - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधान बनण्याची सुप्त इच्छा कधीही लपून राहिलेली नाही. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण असल्याचे संकेत नेहमीच त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस हा सत्ताधारी भाजपाच्या विरोधात अत्यंत दुबळा दिसतोय. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकजुटीने सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. त्याचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे असायला हवे असा आवाज सातत्याने उठताना पाहायला मिळतो. खास करून यूपीए विरोधी पक्ष असला तरी सध्या यूपीए भारतीय जनता पक्षाच्या विरोधात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सक्षमपणे उभा राहू शकेल का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सातत्याने येणारे अपयश पाहता यूपीए मध्ये फेरबदल करण्यात यावेत, यूपीएचे नेतृत्व बदललं जावं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
यूपीच्या नेतृत्वाचा प्रस्ताव आणि जीर्णोद्धार - यूपीएच्या अध्यक्षपदा बाबत आपल्याला कोणताही रस नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवार यांची पंतप्रधान बनण्याची सुप्त इच्छा कधीही लपलेली नाही. शरद पवार यांच्याच पक्षाच्या युवा राष्ट्रीय कार्यकारिणीत यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे असा प्रस्ताव संमत होतो. असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या संमतीविना सहमत होऊ शकतो का? असाही सवाल उपस्थित केला जातो. तसेच महाविकास आघाडीचे जनक म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं. त्याच आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने युपीए मधील बदल किती गरजेचे असल्याचे सांगत आहेत. यूपीएचा जीर्णोद्धार झाला नाही तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विरोधी पक्षाला शिकस्त खावी लागेल असं स्पष्ट मत त्यांनी प्रसार माध्यमातून व्यक्त केल आहे. त्यामुळे यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांकडे दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक सक्षम विरोधी पक्ष उभा केला जाऊ शकतो असं मतही त्यांच्याकडून व्यक्त केले जाते.
परिस्थिती पाहून पर्याय निवडला जाण्याची शक्यता - पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने ते देशभरातील विरोधी पक्षाची जुळवाजुळव आपल्या नेतृत्वाखाली करू शकतात. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुढे चांगला पर्याय उभा राहू शकतात. याबाबत शरद पवार यांना देखील पूर्ण कल्पना आहे. मात्र यूपीचे निर्मिती वेळी ज्या पक्षाची ताकद अजित असेल त्या पक्षाकडे युपीयेचे अध्यक्ष पद राहील असा निर्णय निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे आपल्या पक्षाची संसदेत असलेली ताकद पाहता आपण पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी कितपत दावेदार आहोत याची जाणीव शरद पवारांना आहे. मात्र राजकीय पारिस्थिती पाहता शरद पवार यांच्या मागे दांडगा अनुभव आहे. तसेच या परिस्थितीत शरद पवार यांना सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकत आहे. त्यामुळे सध्या पवार हे पंतप्रधान पदाचे दावेदार वाटत नसले तरी पुढे होणाऱ्या राजकीय हालचाली वरून निर्णय होण्याची शक्यता असल्याचे मतं राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.
नवीन आघाडीसाठी प्रशांत किशोर यांची जुळवाजुळव -तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, उडीसा या दहा अजो बिगर भाजपशासित आहे. या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक मोट बांधण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला असून याबाबतची एक महत्त्वाची बैठक लवकरच दिल्ली किंवा मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. ही बैठक महत्त्वाची असून या बैठकीत शरद पवार यांच्या पाठीमागे ताकत उभे करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितल जातंय.