मुंबई -राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला असल्याने राज्यात सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. त्याशिवाय राज्यातील जनता सुखी होणार नाही. यासाठी ऊन, पाऊस आणि वारा यासोबत आपल्या तबेतीची कोणतीही पर्वा न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तब्बल 60 सभा घेतल्या. या सभा राज्यातील 21 जिल्ह्यातील विविध मतदार संघात घेतल्या असून त्यात सर्वाधिक 25 सभा या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्या खालोखाल मराठवाड्यात 11 सभा घेतल्या आहेत. सर्वात कमी सभा या मुंबईत घेतल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारक नेमण्यात आले होते, त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या काळात 335 एकूण सभा घेतल्या असून यात एकट्या शरद पवार यांच्या 60 सभा आहेत. तर दोन रॅली व रोड शोचाही समावेश आहे. पवार यांनी कळवा-मुंब्रा या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना आणि वाळवा येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या पहिल्या प्रचार सभेपूर्वी पवार यांनी रोड शो केला होता. या दोन्हीही रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.