मुंबई -पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात पूर परिस्थिती गंभीर असताना, त्यांना बाहेर काढणे प्रत्येक राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राजकीय कामात गुंतलेले होते, पण उशिरा का होईना ते आता काम करतायत हे चांगले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राज्यात पूरपरस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या जनादेश यात्रेमधे होते. याबद्दल विरोधकांकडून टीका होत असल्याबाबत पवारांना विचारले असता पवार म्हणाले, राज्यात पूरपरीस्थिती बिकट आहे. अनेक भागात अति गंभीर परस्थितीमधे संकटातील लोकांना प्रथम बाहेर काढले पाहीजे. आपले मुख्यमंत्री राजकीय कामात गुंतले होते. उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागलेत ही चांगलीच गोष्ट आहे, असा खोचक टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
मुख्यमंत्री उशिरा का होईना ते आता काम करतायत - शरद पवार मुख्यमंत्र्यांचा राजकीय कार्यक्रम कित्येक महिने आधी निश्चित झाला असेल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष म्हणुन सांगताना पवार म्हणाले, बिहारमध्ये अशीच पूर परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी परिस्थिती दिसत आहे. पुरग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे. पाऊस आता थांबत आहे. आज एनडीआरएफ आणि जवानांचे जे काम दिसत आहे, ते माझे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून मदतकार्यात उशिर झाला. आपदग्रस्त परिस्थितिमधे योग्य वेळी लक्ष दिले असते, तर कदाचित नुकसान कमी झाले असते, असेही ते म्हणाले. मराठवाडा दुष्काळ स्थितीवर चिंता व्यक्त करत पवार म्हणाले, 13 जिल्ह्यात अजूनही टँकरने पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे. काही ठिकाणचे पाण्याचे टँकर कमी केलेत ती लोकं मला भेटून गेलेत. एकीकडे पूरस्थीती तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य हा मोठा विरोधाभास आहे. यावर उपाययोजना करण्याचे शहाणपण सरकारला सुचेल अशी अपेक्षा करूयात, असे ही पवार म्हणाले.