मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, पालकमंत्री आणि पक्षातील संपर्कमंत्री यांच्यासह महत्त्वांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज या बैठकीमध्ये राज्यभरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पालकमंत्री आणि संपर्क मंत्र्यांकडून शरद पवार प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
बैठकीबाबत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आघाडी सरकारचे दुसरे मंत्री अनिल परब यांना देखील ईडीची (सक्तवसुली संचलनालय) नोटीस आलेली आहे. या सोबतच आज भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे नाशिकमध्ये जात असून छगन भुजबळ यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्याकडून पुन्हा एकदा केला जात आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे ही वाचा -होय, मीच कार्यकर्त्यांना दहिहंडी साजरी करण्यास सांगितले -राज ठाकरे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर चर्चा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर या निवडणुकांचा पेच राज्यामध्ये अधिकच वाढला आहे. या मुद्द्यांवर देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा -जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गिरणा, तितूर नद्यांना पूर