गुवाहाटी/मुंबई - राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही. अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो. कॅबिनेट मंत्री असो किंवा राज्यमंत्री असो आम्हाला कोणत्याच अधिकारांचे वाटप केले नाही, असा गंभीर आरोप बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी ( Shambhuraj Desai on CM ) केला.
शंभूराज देसाई यांचा आरोप -नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील कार्यक्रमात शब्द दिला होता. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने या निर्णयाची मी विधानपरिषदेत घोषणा केली होती. यासाठी 5 कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्य मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी 5 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत, असे आरोप शंभूराज देसाई यांनी केला.