मुंबई -क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान गेल्या 19 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आर्यन खानच्या जामिनासाठी प्रयत्न केले जात आहेत. अभिनेता शाहरूख खान यांची मॅनेजर पूजा ददलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. पूजा ददलानी ही आर्यन खान संबंधी मागितलेली कागदपत्रे अधिकाऱ्यांना सादर करणार असल्याची माहिती आहे. काल देखील शाहरुख खानचा बॉडीगार्ड डॉक्यूमेंट घेऊन आला होता. मात्र, एनसीबी अधिकारी नसल्यामुळे तो परत गेला होता.
आर्यन खानशी झालेल्या चॅटिंगसंदर्भात चौकशी -
आर्यन खानशी अनन्या पांडेचा ड्रग्जसंदर्भात चॅटिंग झाल्याचा संशय एनसीबीला आहे. एनसीबीतर्फे अनन्याची साधारण चार तास चौकशी करण्यात आली. दरम्यान सूर्यास्त झाल्यामुळे अनन्या पांडेची चौकशी संपली. साधारण चार तास ही चौकशी करण्यात आली. अनन्याने एनसीबीला काय उत्तरं दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच एनसीबी अनन्याला पुन्हा एकदा समन्स पाठवणार का? तसेच एनसीबी यानंतर कोणता पवित्रा घेणार? या गोष्टी आगामी काळात स्पष्ट होतील.
आर्यनच्या कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ -
आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आर्यनसह इतर सात जणांच्या न्यायालयीन कोठतीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. 7 तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.