मुंबई- मुंबईत पावसात पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यंदा नालेसफाई उशिरा सुरू झाल्याने कंत्राटदारांना सफाईचे टार्गेट देण्यात आले आहे. 15 मे जवळ आला तरी शहर विभागात नाले सफाई संथ गतीने सुरू आहे. यामुळे या विभागात सफाईचे काम करणारे कंत्राटदार पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.
मुंबईतील नालेसफाई -मुंबईत काही दिवसात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे सखल भागात पाणी साचते. पाणी साचले की नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप केला जातो. यंदा पालिकेचा कार्यकाळ संपल्याने नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नव्हती. पालिकेत प्रशासक असलेल्या आयुक्तांनी उशिराने हे प्रस्ताव मंजूर केले. 15 मेपर्यंत 50 टक्के तर 31 मेपूर्वी 100 टक्के नालेसफाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
शहर विभागात नाले सफाई संथ गतीने -मुंबईत 12 मेपर्यंत शहर विभागात 32 टक्के, पूर्व उपनगरात 60 टक्के, पश्चिम उपनगरात 53 टक्के, रस्त्याकडील मायनर नाले 61 टक्के तर मिठी नदीची 86 टक्के सफाई झाली आहे. एकूण 9 लाख 7 हजार 160 मॅट्रिक टनापैकी 5 लाख 78 हजार 786 मॅट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरच्या तुलनेत शहर विभागात नाले सफाई संथ गतीने सुरू आहे. शहर विभागात छोटे अरुंद रस्ते यामुळे नालेसफाई करताना अडचणी येतात. येत्या काही दिवसात सफाईला गती येईल. जे कंत्राटदार दिलेल्या लक्षाच्या 50 टक्के सफाई करणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक आणि नियमानुसार 15 मेनंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.
एका कंत्राटदाराला नोटीस -मुंबईत 11 एप्रिलपासून मुंबई शहर व उपनगरात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. नालेसफाईचे काम दोन शिफ्टमध्ये करावे अधिक मशीनचा वापर करावे, असेही आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले आहेत. मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी 7 कंत्राटदार व छोट्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी 24 वॉर्डात 24 कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नालेसफाईचे काम वेगाने सुरू असले तरी शहर भागातील वडाळा, वरळी, दादर, माहिम, धारावी या भागातील नालेसफाई संथगतीने सुरू असल्याने कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अशी सुरू आहे नालेसफाई -
एकूण काढायचा गाळ -9 लाख 7 हजार 160 मॅट्रिक टन
काढलेला गाळ -5 लाख 78 हजार 786 मॅट्रिक टन