मुंबई -2021 हे वर्ष खऱ्या अर्थाने वादळी ठरले. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर यावर्षी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यापैकी काही नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जावं लागलं. 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्या नेत्याला चौकशीला सामोरे जावं लागलं. तसेच कोणत्या नेत्यांवर गंभीर आरोप झाले, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट...
अजित पवार -
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ED Enquiry ) त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये आपल्या नातेवाईकांना लाभ पोहचवण्यासाठी कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले असल्याचा आरोप भाजपाचा नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या. अजित पवार यांच्या सख्ख्या तीन बहिणींच्या संस्थांची तपासणी प्राप्तीकर विभागाकडून सहा दिवस सुरू होती. तसेच अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांच्याही मुंबईमधील अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर प्राप्तिकर विभागाकडून सहा दिवस तपासणी सुरू होती. याबाबत खुद्द शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.
नवाब मलिक -
13 जानेवारी 2021 ला नवाब मलिक ( Nawab Malik ED Enquiry ) यांचे जावई समीर खान यांच्यावर (अमली पदार्थ विरोधी पथक) एनसीबीने कारवाई करत त्यांना अटक केली होती. यावेळी समीर खान यांच्या जवळ दोनशे किलो गांजा सापडला असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली. या प्रकरणात समीर खान यांना जवळपास साडे आठ महिने तुरुंगात राहावं लागलं. मात्र त्या प्रकरणात समीर खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. समीर खान यांच्याकडे 200 किलो गांजा सापडलेला नाही. तसेच इतर कोणतेही अमली पदार्थ समीर खानकडे सापडले नाहीत. केवळ राजकीय सूडापोटी केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून ही कारवाई केली गेली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच एनसीबीच्या या कारवाईनंतर एनसीपी चे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांनी ही नोकरी मिळवली असल्याची गंभीर आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला.
अनिल देशमुख -
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ED Enquiry ) यांच्या मुंबई तसेच नागपूर मधील घरावर 2021 साली सीबीआय तसेच ईढीकडून धाडसत्र सुरू राहिले. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पाच वेळा समन्स बजावले होते. त्यानंतर अनिल देशमुख 2 नोव्हेंबरला टीव्ही कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. अद्यापही त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. तसेच ईडीकडून अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता देखील जप्त करण्यात आली. यासोबतच अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इडीकडून समन्स बजावण्यात आलेले आहेत.
एकनाथ खडसे -
राज्याचे महसूल मंत्री असताना भोसरी एमआयडीसीतील जवळपास साडेतीन एकर जमिनी खरेदी प्रकरणात आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका एकनाथ खडसे ( Eknath Khadse ED Enquiry ) यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांचे जावई गिरीश चौधरी आणि पत्नी मंदाकिनी खडसे यांचीदेखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.
हसन मुश्रीफ -
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ED Enquiry ) यांनी गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पारदर्शक निविदा प्रक्रिया न करता ब्रिक्स इंडिया कंपनीला हा कारखाना देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनीचे मालक मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई असून या कंपनीचे बेनामी मालक असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता.
अनिल परब -
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab ED Enquiry ) यांना ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून दोन वेळा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर अनिल परब हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. दापोली ते रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अद्यापही अनिल परब यांच्यावर कारवाईची टांगती तलवार पाहायला मिळतेय. अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे 10 कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमय्या यांच्याकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.
आनंदराव अडसूळ -
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Anandrao Vithoba Adsul ED Enquiry ) यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतल. आनंदराव अडसूळ हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून गणलं जातं. मात्र आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरु असून आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याही अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.