मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान १६ हजार ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २५ टक्के मृत्यू हे कोविडसाठी कार्यरत असलेल्या सेव्हन हिल रुग्णालयात झाले आहेत. तसेच या रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे नऊ ते दहा टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत जे कोविड मृत्यू होत आहेत त्यामधील सर्वाधिक मृत्यू हे सेव्हन हिल रुग्णालयात होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सेव्हन हिल रुग्णालयात सर्वाधिक मृत्यूंची नोंद होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णालयाकडे आणि रुग्णांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहेत.
कोरोनाचा प्रसार -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेले २ वर्षे पालिका प्रशासन कोरोना पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करत आहे. या कालावधीत मुंबईमध्ये कोरोनाच्या तीन लाटा आल्या. दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश येताना आहे. गेल्या दोन वर्षात १० लाख १७ हजार ९९९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ६६ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनासाठी विशेष रुग्णालय -
कोरोनाच्या प्रसारादरम्यान पालिकेने आपल्या रुग्णालयासह खासगी रुग्णालये ताब्यात घेतली होती. त्याचवेळी बंद पडलेले अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालय विशेष कोव्हीड रुग्णालय म्हणून सुरु करण्यात आले. कोरोनाच्या रुग्णांवर गेले दोन वर्षे उपचार केले जात आहेत. नव्याने आढळून आलेल्या ओमायक्रॉन रुग्णांवरही सेव्हन हिल रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
मुंबईतील २५ टक्के मृत्यू सेव्हन हिल रुग्णालयात-
कोरोनाच्या सुरुवातीपासून १५ जानेवारी २०२२ पर्यंत या रुग्णालयात ४६ हजार १५ कोविड रुग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यापैकी ४० हजार ६८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण १६ हजार ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील एकूण मृत्यूचा विचार केल्यास त्याच्या २५ टक्के मृत्यू हे एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात झाले आहेत. तसेच या रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात सुमारे ९ ते १० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सेव्हन हिल रुग्णालयात जे ४३५६ मृत्यू झाले आहेत त्यापैकी मुंबईमधील २८२८, मुंबई बाहेरील ७९० तर ७३८ इतर मृत्यू आहेत.
या कारणामुळे मृत्यू-
सेव्हन हिल हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी मुंबईमधून कोविडमधून बरे न होणारे रुग्ण पाठवले जातात. पालिका आणि खासगी रुग्णालयातूनही रुग्ण पाठवले जातात. विशेष करून ९० टक्के रुग्ण हे ६० वर्षावरील तर ८० टक्के रुग्ण हे इतर सहव्याधी असलेले रुग्ण असतात. शेवटच्या क्षणाला रुग्ण रुग्णालयात येत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. १ जानेवारी ते आतापर्यंत ८७ मृत्यू झाले आहेत त्यापैकी ७३ मृत्यू हे शेवटच्या क्षणाला बाहेरून रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सेव्हन हिल रुग्णालय-
अंधेरी मरोळ येथे सेव्हन हिल रुग्णालय आहे. हे रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देण्यात आले होते. पालिका आणि संस्थेमध्ये वाद झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर हे रुग्णालय संस्थेने बंद केले. मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर पालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन पुन्हा कोविड रुग्णालय म्हणून सुरू केले. यामधील काही भाग रिलायन्स या कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला आहे.
१८५० बेडचे रुग्णालय -
सेव्हन हिल रुग्णालयात १८५० बेड असून त्यापैकी १७०० बेडस पालिकेच्या तर १५० बेडस रिलायन्सच्या ताब्यात आहेत. त्यात आयसोलेशनचे १५२४ बेडस असून पालिकेकडे १४०० तर रिलायंसकडे १२४ बेडस आहेत. ३२६ आयसीयू असून ३०० तर रिलायन्सकडे २६ आयसीयू आहेत.
- मुंबईतील एकूण मृत्यू - १६४८८
- सेव्हन हिल मधील मृत्यू - ४३५६
- मुंबईमधील मृत्यू - २८२८
- मुंबई बाहेरील मृत्यू - ७९०
- इतर मृत्यू - ७३८