मुंबई - मुंबै बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जोगळेकर यांनी निकाल 5 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे मुंबै बँकेत असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई बँकेत 123 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाला असल्याचा आरोप तक्रारदार विवेकानंद गुप्ता यांनी गुन्हे शाखेकडे केला होता. सत्र न्यायालयात या सर्व प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज न्यायाधीश जोगळेकर याबाबत निकाल देण्याची शक्यता होती. मात्र न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 5 ऑक्टोबरला देणार असल्याचे आज जाहीर केले आहे.
सहकार विभागाकडून मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश -
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. बँकेच्या कामकाजात असलेल्या अनियमिततेमुळे बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्यास सहकार विभागाने सांगितले आहे. मात्र केवळ राजकीय सूडापोटी सहकार विभागाकडून अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच आपल्यावर असलेल्या राजकीय सूडापोटी बँकेला धारेवर धरले जात असून काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बँकेची बदनामी केली जात असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे जाणून-बुजून बँकेची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटींचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.