मुंबई - नाना चौक येथील कमला या इमारतीला २२ जानेवारीला आग लागली ( Fire Incident Mumbai ) होती. या आगीत २९ जण जखमी झाले. या जखमींपैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील ८ जणांची प्रकृती गंभीर होती. त्यात आता आणखी एकाची भर पडली असल्याने गंभीर रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. जखमींपैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विविध रुग्णालयात दाखल- ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारत आहे. २० मजली असलेल्या या इमारतीत १९ व्या मजल्यावर २२ जानेवारीला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग ( Mumbai Fire Incident ) लागली. या आगीवर १३ फायर इंजिन, ८ जम्बो टॅंकरद्वारे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळवले होते. आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने अग्निशमन दलाने त्यांची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत २९ जणांना भाटिया, कस्तुरबा, नायर, मसीना आदी रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील ७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
९ जण आजही गंभीर - मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कस्तुरबा रुग्णालयात १, मासिना रुग्णालयात १ तर भाटिया रुग्णालयात दाखल असलेल्या १२ पैकी ७ जण अशा एकूण ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. नायर रुग्णालयात २ जण दाखल असून त्यापैकी मंजू खन्ना यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.