मुंबई - जायंट किलर अशी ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे आज (28 एप्रिल) कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे 81 वर्षाचे होते. त्यांना २० दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी १०.०० वाजता त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाले. ते शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होणार आहेत.
यामुळे म्हटले जात होते 'जायंट किलर'
साधी राहणीमान असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड 1999 ते 2004 काळात महाराष्ट्रात राज्यमंत्री होते. त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार व उच्च व तंत्र शिक्षण अशी विविध खाती सांभाळली होती. राज्यमंत्री म्हणून गायकवाड यांनी केलेली कामगिरी पाहून पक्षश्रेष्ठींनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना पराभूत करुन जायंट किलर अशी प्रतिमा निर्माण केली होती. 2009 ते 2014 या काळात त्यांनी दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघातून काँग्रेसचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता. तसेच, 2020 मध्ये त्यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
धारावीतुन तीन वेळा आमदार
एकनाथ गायकवाड हे मुंबईतील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांपैकी एक होते. धारावी विधानसभा मतदारसंघातुन ते तीन वेळा निवडून आले होते. 1985 ते 1990, 1990 ते 1995 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी आमदार म्हणून धारावीचे प्रतिनिधित्व केले होते. गायकवाड यांचे निवासस्थान विक्रोळीत आहे. मात्र, त्यांची धारावीवर चांगली पकड होती. त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.