मुंबई -वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा (Colaba Police Station) दाखल झाला होता. याप्रकरणात आज रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात आली आहे. आज सकाळी 12 वाजता रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांकडून दोन तास चौकशी करण्यात आली.
रश्मी शुक्लांची पुण्यात 23 मार्चला होणार पुन्हा चौकशी -
रश्मी शुक्ला यांनी चौकशीनंतर त्यांच्या वकिलांची मरीन लाईन येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. तसेच चौकशीदरम्यान काय विचारण्यात आले याची सर्व माहिती त्यांनी त्यांच्या वकिलांना देखील दिली आहे. 23 मार्च रोजी फोन टॅपिंग प्रकरणात पुणे येथील पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला आल्या होत्या. यापूर्वीही पुणे येथे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
कुलाबा येथील गुन्ह्यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अंतरिम दिलासा दिला होता. तसेच न्यायालयाने सूचना देखील केल्या होत्या. पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले होते. त्याच वेळी न्यायालयाने तपासाला जाणाऱ्या तारखा देखील घोषित केल्या होत्या, त्यानुसार आज रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
काय आहे प्रकरण?
राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले? त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई उच्च न्यायालयात केला होता अर्ज -
रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.