मुंबई -हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? असा सवाल आजच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि कंगना रणौत हिचे नाव न घेता शिवसेनेने टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांचे समर्थन केले तर राज्यसभेत विरोध केला होता.
अग्रलेखातील ठळक मुद्दे -
"एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरोधी उभ्या ठाकलेल्या बाहेली सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा अवमान आहे. त्या अवमानावर नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तर इतिहास त्यांना माफ करणार नाही. आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी 'आतंकवादी' किंवा 'दहशतवादी' आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे." अशा शब्दांमध्ये सामनातून कंगना रणौत समर्थक आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला.
..शेतकऱ्यांवरील लाठीमार हा खरा दहशतवाद
"मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक विधेयक संसदेत आणले. हे विधेयक क्रांतिकारक, ऐतिहासिक, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना दुसरे स्वातंत्र्य मिळवून देणारे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. ते बरोबर असेलही. पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे? शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल", असे म्हणत शेतकऱ्यांवरील दडपशाहीविरोधात सामनातून टीका करण्यात आली.