मुंबई - हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या भारत पेट्रोलियम म्हणजेच बीपीसीएल या तेल उत्पादन कंपनीचे खासगीकरण करून, ती कवडीमोल दराने अंबानी यांच्या घशात घालण्याचा डाव नरेंद्र मोदी सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच याचा विरोध करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्यचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.
हेही वाचा मनसेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची माघार; मुंब्र्यातही एमआयएमच्या उमेदवाराचे घुमजाव
बीपीसीएल या कंपनीची एकूण मालमत्ता 3 लाख 50 हजार कोटींहून अधिक असताना ही कंपनी केवळ 65 हजार कोटींना मोदी सरकार विकत असून, त्याचा विरोध कंपनीतील विविध संघटनांकडून करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. बीपीसीएल या कंपनीची देशभरात 14 हजार 800 केंद्र आहेत. याचसोबत मुंबईत 600 एकर जागा तसेच देशात हजारो कोटींची मालमत्ता असून, राज्यात सहा हजार 600 कर्मचारी आहेत. देशभरात 13 हजारांहून अधिक कर्मचारी तसेच लाखो विविध प्रकारचे कामगार या कंपनीत कामाला आहेत. हे सर्व उद्ध्वस्त होणार असून, त्याविरोधात देशातील सर्व विरोधकांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.