मुंबई : भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (BJP leader Prasad Lad) यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीतील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रसाद लाड आणि कुटुंबियांच्या क्रिस्टल कंपनीने पुणे महापालिकेला कंत्राटी सुरक्षारक्षक पुरवले होते. त्यातील अश्विन वसंत पवार यांनी तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसाद लाड हे भाजपा उपाध्यक्ष असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Leader of Opposition Devendra Fadwanis) यांचे निकटवर्तीय आहेत. महापालिकेत त्यांचा दबदबा असून पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन महिने पगार नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न : पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट भाजप नेते, उपाध्यक्ष प्रसाद लाड कुटुंबाच्या क्रिस्टल कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून सुमारे १५०० सुरक्षारक्षक महापालिकेस पुरविण्यात आले आहेत. महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये, उद्याने, महापालिकेच्या विविध विभागांच्या इमारती, कार्यालय यांच्या सुरक्षेचे काम त्यांना देण्यात आले आहे. अश्विन पवार यांची टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून कंपनीकडून पगार थकविण्यात आल्याने सुरक्षारक्षक पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सोमवारी उघडकीस आले. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पवार यांच्यावर ही वेळ आली असून अधिकारी हे कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला आहे. सुरक्षारक्षकांना कायद्यांतर्गत कोणतेही लाभ दिले जात नाहीत त्याबाबत सातत्याने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही असेही ते म्हणाले.