मुंबई -मलाड परिसरातील एका सोसायटीमधील सुरक्षारक्षकाने लग्नासाठी पैसे जमवण्याकरिता 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 50 हजार रुपयांसाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मलाड पोलिसांनी आरोपी मुकेश जयपाल सिंह (वय 27) यास 17 तासांत अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
4 वर्षीय मुलाचे अपहरण करणारा सुरक्षारक्षक गजाआड, 50 हजार रुपयांची मागितली होती खंडणी - मुकेश सिंह अटक
मलाड परिसरातील एका सोसायटीमधील सुरक्षारक्षकाने लग्नासाठी पैसे जमवण्याकरिता 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 50 हजार रुपयांसाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मलाड पोलिसांनी आरोपी मुकेश जयपाल सिंह (वय 27) यास 17 तासांत अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश जयपाल सिंह मालाड पश्चीम येथील नाडियादवाला कॉलनी क्रमांक 1 येथे 4 वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडित मुलगा आणि त्याचे आईवडीलही त्याच परिसरात राहात होते. पीडित मुलाचे आईवडील हे मजूर आहेत. आरोपी आणि पीडित मुलाचे कुटुंबीय एकमेकांना चांगले ओळखतात. या ओळखीतून तो अनेकदा या लहान मुलाला चॉकलेटही देत असे. घटनेच्या दिवशी आरोपी रात्री 8 च्या सुमारास मुलाला चॉकलेट देण्यासाठी घेऊन गेला. मात्र, त्यानंतर मुलगा परत आलाच नाही. त्यानंतर आरोपीने सुपरवायझरला मुलाच्या सुटकेसाठी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलिसात धाव घेऊन मदत मागितली.
पालकांची तक्रार मिळताच डीसीपी विशाल ठाकूर आणि एसीपी रेणुका बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. आरोपी सिंह याच्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क केला. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपीला सतत भेटणाऱ्या त्याच्या मित्राचाही फोन ट्रॅक केला. मात्र, त्याचाही फोन बंदच आढळला. शेवटी आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला दहिसर पश्चिमेस असलेल्या कांदरपाडा परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मुलाचीही सुखरुप सुटका केली. पोलिसांनी सिंह याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत त्याने लग्नासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे हा गुन्हा केल्याचे सांगितले.