मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लांबलेल्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि विधान परिषदेमध्ये उपसभापती पदाची निवडणूक या दोन महत्त्वाच्या घटना आज घडतील. कोविड-19 चे संकट लक्षात घेत या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये जवळपास 65 पेक्षा जास्त अधिक लोक कोरोना बधीत झाल्याचे आढळून आले होते. सहा ते सात आमदारांनाही कोरोनाची बाधा झाली होती.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस; पुरवणी मागण्यांवर होणार चर्चा काल विधानसभेत शासकीय विधेयके पुनर्स्थापित करण्यात आले असून या विधेयकावर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी ग्रामपंचायत सुधारणा विधेयक देखील आज विधानसभेत चर्चेला येईल.
महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपने विधान परिषद उपसभापती पदासाठी भाई गिरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप त्यांचा उमेदवार दुपारपर्यंत मागे घेईल आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडेल अशी अपेक्षा आहे.
अधिवेशनाचा पहिला दिवस हा प्रामुख्याने शोक प्रस्तावाचा होता त्यामुळे विरोधक शांत होते. आज विरोधक आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत. कोविडच्या संकटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तरीही शासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधीपक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचं सांगितलं जात आहे. विरोधी पक्षांनी बॅनर आणून सरकारचा निषेध करण्याची देखील तयारी केली आहे.
या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. सरकारे मांडलेल्या 29 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर या अधिवेशनाचे सूप वाजेल. केवळ दोन दिवस चालणारे हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. कालावधी कमी असला तरी सत्ताधाऱ्यांचा कल हा आर्थिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याकडे आहे. विरोधक मात्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोणती संधी सोडायला तयार नाहीत हे सर्वसाधारण चित्र आहे.